मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

स्वच्छ भारत आणि BVG


८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्ण झाले. या साहित्य संमेलनात मला भावलेली एक गोष्ट म्हणजे संमेलन स्थळी जाणवणारी स्वच्छता. २००८ ला ८१ वे अ.भा.म.सा. संमेलन सांगली येथे झाले त्यानंतर महाबळेश्वर, पुणे, ठाणे, चंद्रपूर, सासवड, चिपळूण, घुमान व पिंपरी-चिंचवड येथे संमेलने झाली. यातील घुमान वगळता इतर सर्व ठिकाणी उपस्थित होतो.
वरील सर्व ठिकाणच्या साहित्य संमेलनामध्ये स्वच्छतेचा सगळ्यात चांगला अनुभव मला पिंपरी-चिंचवड मध्ये आला. इतर सर्व ठिकाणच्या संमेलनामध्ये आयोजकानी स्वच्छतेकडे लक्ष दिले होते मात्र भारतीय स्वभावाला अनुसरून रसिकांनी तसेच भेट देणाऱ्या माणसांनी कुठेही कचरा करण्याची आपली सवय सोडून दिली नाही. त्यामुळे जेवणाच्या ठिकाणी तसेच ग्रंथदालनात व सभामंडपात कचरा दिसायचा.
BVG या संमेलनात कचरा व्यवस्थापन करणार हे समजताच मी सुखावलो. मात्र मला उत्सुकता होती की ‘सतत चालू असणाऱ्या या कार्यक्रमात आणि आपल्या बेफिकीर वृत्तीने कचरा करणाऱ्या जनतेला BVG आवर कसा घालणार?’ हा प्रश्न कसा सोडवेल? सतत माणसांचा राबता असणाऱ्या ठिकाणी स्वच्छतेला वेळ कधी मिळणार?
मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे संमेलनस्थळी याची देहा, याची डोळा मिळाली. एका विशिष्ट युनिफॉर्ममधील ही स्वच्छता सेना सफाईत एवढी तत्परता दाखवत होती की कुठेही कचऱ्यामुळे माश्या व दुर्गंधी जाणवली नाही. अगदी स्टेजपासून खाद्यपदार्थाच्या स्टॉलपर्यंत सर्वत्र सतत कुठेही कागद, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व इतर प्रकारचा कचरा लगेच उचलला जात होता. जागोजागी कचऱ्याचे डबे ठेवलेले होते. मात्र कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकण्याऐवजी कचऱ्याच्या डब्याच्या बाजूला कचरा टाकण्याची सवय आपल्या माणसांना आहे. (ही सवय वेळच्या वेळी कचरा न उचलणे व त्यातून पसरलेल्या दुर्गंधामुळे कचऱ्याच्या डब्याजवळ न जाता लांबूनच कचरा भिरकावून देण्याच्या वृत्तीतून निर्माण झाली आहे. आणि ती आता सुटत नाही, असो.) BVG च्या स्वच्छतादूतांनी कचऱ्याचा डब्बा भरायच्या आधीच तो कचरा उचलला जाईल अशी व्यवस्था केली होती. शौचालय व स्वच्छतागृहाच्या ठिकाणी पाण्याची सोय व कमालीची स्वच्छता दिसली. सलाम!!!
आशा आहे की लवकरच भारतीय माणसांच्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विकसित होतील. स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होईल. परदेशी पर्यटकांना आपल्या देशाला भेट दिल्यावर समाधान वाटेल असा भारत घडविणे आपल्या सर्वांच्या हातात आहे. BVG ने आपले योगदान दिले आहे. आता तुमची आमची प्रत्येक भारतीयांची स्वच्छतेची बांधिलकी सुरू होते. स्वच्छ भारतासाठी शुभेच्छा.
Thank You BVG. !!!

-       अमोल चंद्रकांत कदम, संपादक- मासिक नवी अर्थक्रांती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा