२८ जानेवारी २०१६
आयुष्याकडून काय पाहिजे आपल्याला? पैसा,
आनंद, विश्रांती, ऐषाराम की अजून काही? मात्र त्याबदल्यात आपण आयुष्याला काय देणार
आहोत? एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तिचा मोबदला हा द्यावाच लागेल हा विश्वाचा सरळ नियम
आहे. गेला महिनाभर मी स्वत: काही करत नाही. आणि तरीही त्याबदल्यात काही किंमत न चुकवता
मी जगतोय. हे जगणे मला आता नको वाटत आहे. म्हणजे मला जगण्याचा त्याग करायचा नाही. निरर्थक
जगण्याच्या पध्दतीचा त्याग करून मला नवी अर्थपूर्ण पध्दत शोधून काढून त्यावर काम करायचे
आहे.
आता जरा हे मी सविस्तर लिहतो. म्हणजे
काय तर गेला महिनाभर मी काही कमावलेले नाही. कामही केलेले नाही. मग मी केले तर काय
एक महिना? विराजच्या खोलीत त्याच्याच पैशात जेवणे आणि चित्रपट पाहणे तेही त्यानेच मारलेल्या
नेटपॅक वर. असे तब्बल १५ -२० दिवस घालवले.
४ दिवस साहित्य समेंलनात तेही रविराजच्या खोलीत राहून आणि त्याच्या पैशाने जेवण करून
जगलो. मी माझ्या मित्रांच्या पैशावर त्यांच्या जीवावर जगलो यामुळे मला वैताग आलाय असे
नाही तर मला काही न करता दिवस ढकल्याने नैराश्य आले आहे. हे पैसे माझे असते तर आणि
माझ्याच खोलीत मी असा बिनधास्त (बेपर्वाईने) राहिलो तरीही माझी आज हीच अवस्था झाली
असती. माझे आदर्श असे कधीच नव्हते.
मला आयुष्याकडून काय पाहिजे? आधी ह्या
प्रश्नाचे उत्तर देतो. मला आनंद पाहिजे. माझा आनंद म्हणजे काय? आणि तो मला किती पाहिजे?
हेही सविस्तर जरासे. माझा जन्म हा स्वत:साठी न जगता या जगातील काही माणसांच्या आयुष्यात
काहीतरी चांगलं देण्यासाठी झालाय. हे माझं ठाम मत आहे. आणि ते देताना मला कराव्या लागणाऱ्या
कर्मात माझा खरा आनंद आहे. मग हे काम करताना अडचणी आल्या तरी त्यात मला माझा आनंद शोधायचा
आहे. दिवसभरातील शक्य तितका जास्त वेळ हे काम करताना मला व्यतीत करायचा आहे. आणि शेवटी
दमून भागून झोपेच्या कुशीत असे शिरायचे आहे की झोप येण्यासाठी मला अंथरून पांघरून याची
शुध्द न राहता मिळेल त्या जागेवर पडताक्षणीच निद्रादेवीने मला आपल्या कुशीत घ्यावं.
ही बाब माझ्यासाठी आनंदाची आहे. विश्रांती आणि आरामाच्या बाबतीत काही बोलू या आता.
माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला माझ्यामुळे निर्माण झालेला
आनंद हा माझ्यासाठी आराम असेल. वर वर्णन केलेली चिरनिद्रा माझ्यासाठी विश्रांती असेल.
आणि एक दिवस या चिरनिद्रेत कायमचे गाढ झोपून जाणे कधीही न उठण्यासाठी हा माझ्यासाठी
पूर्ण विराम असेल.
आव्हानावरती स्वार होण्यासाठी वीराचा
जन्म होत असतो. तो होऊन आता २३ वर्षे पूर्ण झाली आहेत तरी अजून म्हणावा तसा पराक्रम
करण्याची संधी मी शोधून त्याच्यावर स्वार होऊन विजयश्री खेचून आणलेली नाही. मात्र भूतकाळावर
जास्त विचार न करता मी आतापासूनच यासाठी कामाला सुरवात करतोय. अखंडपणे हे काम करता
करता माझ्या म्हणण्याप्रमाणे आराम व विश्रांतीचा लाभ घेत जगायचं आहे.
वेळ खूप कमी आहे. उणीपूरी २० वर्षे
माझ्याकडे आहेत. या कालावधीत मला बरंच काम करायचं आहे. यानंतर मी जगलो तर मला आता ठरविलेल्या
योजना पूर्ण झालेल्या पाहायच्या आहेत. ह्या २० वर्षात. त्यानंतर मी अजून उदात्त धेय्यासाठी
काम करीन. चला ठीक आहे. उशीरा का होईना हे शहाणपण जीवनाने शिकवले. अजून एक मी विवेकानंदाच्या
जीवनावरील त्यांच्याच शब्दात व्यक्त केलेला आत्मचरित्रपट पाहिला. आणि त्यात स्वामी
एक वाक्य म्हणाले की, “मैने खुद के लिए जो भी सपना देखा है वह कितना भी छोटा क्यू न
हो कभी हकिकत मे नही बदला है और मैने दुसरो के लिए जो भी सपना देखा है वह जरूर हकीकत
मे बदला है वह कितना भी कठिण क्यू न हो?” ह्या वाक्यानंतर मी माझ्या भूतकाळवर नजर फिरवून
पाहिले की हे वाक्य माझ्यासाठी पण शत प्रतिशत सत्य आहे. मग मी आता हा विचार करतो की
दुसऱ्यासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण होत असतील तर त्या स्वप्नांसाठीच काम करू या. त्यात
माझा आनंद ही आहे. जीवन जगण्यासाठी फक्त आनंद लागतो. मग तुम्ही संकटात असा, निराशेत
असा, त्रासलेले असा की अजून कोणत्याही परिस्थितीने जखडलेले असा तुम्हाला आनंद मिळवायची
कला शिकली पाहिजे. ही खरी सामर्थ्याची सुरवात आहे. तुम्हाला संकटात, निराशेत झोपेत
अगदी सर्व अवस्थामध्ये आनंदाचा अखंड झरा वाहताना अनुभवता आला पाहिजे. हे वाक्य विरोधाभास
निर्माण करणारे असले तरी सत्य आहे. मी संकटात आनंद व्यक्त केला आहे. अगदी परमोच्च आनंद
होता तो.
संकटात मिळणारा आनंद हा संकटातून जन्म
घेणाऱ्या उद्याच्या आशावादी जीवनाचा अंकुर पाहून होत असतो. तुम्ही कायम भविष्याकडून
जगला पाहिजे तेही वर्तमानात. भूतकाळाला काही औषध नाही. तुम्ही कितीही मोठे पराक्रम,
अक्षम्य अपराध किंवा न सुधारता येणाऱ्या चुका केल्या असतील तरी तुम्ही भूतकाळ बदलू
शकत नाही. त्यातून जो काही धडा घ्यायचा तो घेऊन पुढे वाटचाल सुरू करणे हे जगणे आहे.
अजून काही बाबतीत मला स्पष्टीकरण द्यायचे
आहे. मला संरक्षणाची कुंपणे नको आहेत. गरूडभरारीचे स्वांतत्र्य हवे आहे. त्यातून मला
उदात्त साहस निर्माण करता येते. भले जखमा झाल्या तरी चालतील. त्या जखमा माझ्यासाठी
पुरस्कार असतील. त्याचा मला अभिमान असेल. याचा अर्थ मला ही गरूडभरारी घेताना जखमाच
पाहिजेत असा होत नाही. मला सरावाने त्या जखमा टाळता येण्याचे कसब अवगत करून घेता आले
पाहिजे किंवा सुरवातीला जखमा न होता ही भरारी घेता आली तरी चालेल. स्वांतत्र्य पाहिजे
त्याची किंमत काही असो ती मी आता मोजायला तयार आहे. प्रेम आणि काळजी यातला फरक समजून
घेऊन मला उदंड प्रेम देण्याची व घेण्याची आस आहे. मात्र यात काळजीची मात्रा तसूभरही
नको आहे. मला चालयला शिकायचं असेल तर पडण्याची काळजी कशाला? चालायला शिकल्यावर मिळणारा
आनंद वाटायला प्रेम करणारी व प्रेम स्वीकारणारी माणसे हवी आहेत.
गेला महिनाभर स्वत:ची बरीच काळजी घेतली
आहे. आता हे थांबवायला पाहिजे. कुठे पडू नये म्हणू फार सावधगिरीने वाटचाल केली. मात्र
या काळजीत मी स्वत:ला हरवून गेलो आहे. माझा वेग हरवला आहे. स्वातंत्र्य हरवले आहे.
आणि हो जगण्यातला आशावाद सुध्दा हरवला आहे. आता मला या सगळ्या गोष्टींचा नवा शोध घेण्याची
वेळ झाली आहे. आता माझ्या वाटचालीचा वारू वाऱ्याच्या वेगाने झेपावेल संकटे पायदळी तुडवेल.
आणि विजयाचे निशाण फडकवत पुढे पुढे जातच राहिल.